
नाम फाउंडेशन तर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार
— कुर्ला येथे ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते बियाणे वाटप
बीड अक्षरधाम प्रतिनिधी -पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन यांच्यातर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. आज कुर्ला येथील 200 शेतकऱ्यांना या बियाण्याचे वाटप स्वराज्य जनजागृती परिषदेचे अध्यक्ष ॲड .अजित एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी तीस किलो हरभऱ्याचे बी आणि आठ किलो ज्वारीचे बी देण्यात येणार आहे.
कुर्ला येथे अतिवृष्टीसह मोठ्या पुराच्या पाण्यात लोक देखील अडकले होते. शेतीचे या ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र टीम बाहेरून मागवण्यात आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता होती.
स्वराज्य जनजागृती परिषदेचे सचिव तुषार पाटील यांच्यासह रत्नाकर मार्कड घोडके सर, गोवर्धन मस्के आणि इतरांनी या कामी पुढाकार घेतला. आज या ठिकाणच्या दोनशे शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी ॲड देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले बियाणे पेरून चांगल्या प्रकारचे उत्पादन घ्यावे आणि नामचा उद्देश साध्य करावा, असे त्यांनी यावेळी म्हटले. तुषार पाटील यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. गावातील जवळपास दोनशे शेतकरी त्याचबरोबर उपसरपंच देखील यावेळी उपस्थित होते.

