परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे “संजीवनी क्लिनिक”चे उद्घाटन संपन्न

परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे “संजीवनी क्लिनिक”चे उद्घाटन संपन्न

बीड अक्षरधाम प्रतिनिधी (मानूर, ता. शिरूर कासार):दिनांक 31 मार्च 2026 रोजी मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या *“संजीवनी क्लिनिक”*चे उद्घाटन परमपूज्य श्री ष. ब्र. 108 गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडले.

 

ऐतिहासिक परंपरा आणि जुन्या बाजारपेठेसाठी ओळख असलेल्या मानूर नगरीत अद्ययावत आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही गरज ओळखून डॉ. जितीन वंजारे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने येथे दर्जेदार व किफायतशीर आरोग्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ नेते मा. दशरथरावजी वणवे (माजी जि.प. सदस्य) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गावकऱ्यांना उत्तम वैद्यकीय सेवा देणे ही काळाची गरज आहे. डॉ. वंजारे यांनी अधिकाधिक वेळ देऊन सेवा करावी, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.”

तसेच जि.प. सदस्य मा. रामदास बडे यांनीही “मानूरमध्ये डॉक्टरांची नितांत गरज असून किफायतशीर दरात उत्तम सेवा द्यावी” असे आवाहन करत शुभेच्छा दिल्या.

 

अंबिकानगरचे माजी सरपंच बाबासाहेब ढाकणे यांनी डॉ. वंजारे यांच्या पूर्वीच्या सेवांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. जयसिंगकाका शिरसाठ यांनीही नव्या क्लिनिकसाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की,

“डॉ. वंजारे यांच्या हातून मानूर व परिसरातील नागरिकांची सेवा घडो. त्यांनी योग्य मार्गदर्शन व उपचार करून नाव लौकिक मिळवावा. मानूर संस्थान त्यांच्यासोबत आहे.”

 

यानंतर महाराजांच्या हस्ते फित कापून क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

या प्रसंगी मा. गहीनाथ शिरसाठ (सभापती), मा. अशोक पाखरे (सरपंच), मा. खलंदर पठाण (समाजसेवक), मा. मोहबत खान पठाण (उपसरपंच), तसेच अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मानूर परिसरासाठी “संजीवनी क्लिनिक” हे आरोग्यसेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *