मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. रमेश लांडगे यांच्या संशोधन पेपरची निवड
मलेशियात होणार अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर
बीड अक्षरधाम शिरूर कासार (प्रतिनिधी) युनिव्हर्सिटी पुत्र मलेशिया येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. डॉ. रमेश लांडगे यांच्या संशोधन पेपरची निवड झाली असून दिनांक २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पेपरचे वाचन होणार आहे.
कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर कासार येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. रमेश लांडगे यांची एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून ओळख असून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्र परिषदांसाठी त्यांनी लेखन केले असून साधन व्यक्ती म्हणूनही त्यांनी अनेक वेळा सभागृहास संबोधित केले आहे. १० राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा सह ७ संपादित ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
इंग्रजी साहित्याबरोबर सामाजिक जाणीवेतून महापुरुषांच्या जीवन कार्यावर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करत महापुरुषांचा विचार जनमानसात पोहोचविण्याचे काम अविरतपणे ते करत आहेत. याचाच भाग म्हणून वास्तववादी आणि दर्जेदार लेखन करणारे प्रा. रमेश लांडगे यांच्या संशोधन पेपरची दखल घेत मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांच्या संशोधन पेपरची निवड करण्यात आली आहे.
चौकट………………………………………………………
बोधी आंतरराष्ट्रीय पत्रिका आणि युनिव्हर्सिटी पुत्र मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ रोजी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. रमेश लांडगे हे अण्णाभाऊंचा सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा विचार मांडणार असून आत्तापर्यंत अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास आणि समाज परिवर्तनासाठी केलेल्या कामाचा रिझल्ट म्हणून “अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य: सामाजिक परिवर्तनाचा आराखडा” हा संशोधन पेपर मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत निवडण्यात आला असल्याचे प्रा. रमेश लांडगे म्हणाले.

